न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२४) :- बसची फेरी रद्द झाल्यावर प्रवाशांची गैरसोय होवू नये, किंवा बसस्थानकावर जास्त वेळ थांबायला लागू नये, यासाठी फेरी रद्द झाल्याची माहिती डेपोतील सूचना फलकावर लावावी, असे आदेश पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.
शहरात विविध कारणांमुळे दिवसाला साधारण ४५ ते ५० पीएमपी बसचे ब्रेकडाउन होते. त्यामुळे त्या मार्गावरील फेऱ्या रद्द होतात. मात्र, त्याबाबत नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहिती नसल्यामुळे प्रवाशी बस थांब्यावर उभे राहतात. चौकशी केल्यानंतर फेरी रद्द झाल्याचे लक्षात येते. त्या पार्श्व् भूमीवर पीएमपीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते यांनी प्रवाशांच्या सोईसाठी फेरी रद्द झाल्याची माहिती डेपोमध्ये सूचना फलकावर लावा, अशा सूचना सर्व डेपोंना दिल्या आहेत.
जानेवारी महिन्यात पीएमपीच्या मार्गावर असलेल्या १३६८ बसचे ब्रेकडाऊन झाले आहे. पीएमपीच्या ताफ्यातील बसला दहा वर्षेपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पीएमपीला तातडीने नवीन बसची आवश्यकता आहे.











