- संबंधित विकासकाला पाठविली नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- थेरगावच्या दुर्गानगर परिसरात झुकल्याने धोकादायक बनलेली इमारत महापालिकेने बुधवारी पाडली. याबाबत महापालिकेने संबंधित विकासकाला नोटीस दिली आहे. इमारत पाडण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेचा खर्चही या विकासकाकडून घेण्यात येणार आहे.
दुर्गानगरमध्ये बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडून ३ नोव्हेंबर २०२२ रोजी इमारत बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, नोव्हेंबर २०२२ मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही इमारत पुढील बाजूस झुकली असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशामक विभागाला माहिती दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी महापालिकेने ती जमीनदोस्त केली.
ती लोकवस्तीच्या परिसरात कोसळली असती तर दुर्घटना घडली असती. त्यामुळे याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, विकासकाला नोटीस दिली आहे. महापालिकेने बांधकाम पाडण्यासाठी मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर केला. त्यामध्ये दोन पोकलेन, एका अतिरिक्त पोकलेनसह ट्रॅक्टर, डंपर यांची मदत घेण्यात आली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, यासाठी झालेला खर्च या विकासकाकडून वसूल करण्यात येणार आहे.
या बांधकाम व्यावसायिकाला ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयामधून परवानगी देण्यात आली होती. मात्र, इमारत झुकल्याने ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. त्याच्याकडून खर्च वसूल करण्यात येणार आहे.
– सुनील भागवानी, कार्यकारी अभियंता…











