न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेच काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपचे तीन, शिवसेना १, राष्ट्रवादी १ व काँग्रेस या सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल करण्यात आले असतानाच ऐनवेळी पुण्यातील विश्वास जगताप यांनी अर्ज दाखल केला. मात्र, छाननीत हा अर्ज बाद होणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. शेवटच्या दिवशी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ, अजित गोपछडे, तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज दाखल केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी यावेळी हजेरी लावली.
काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज दाखल होताना नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, अजय चौधरी उपस्थित होते. पुण्यातील विश्वास दत्तात्रय जगताप यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, त्यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक यांच्या पुरेशा सह्या नसल्याने तो अर्ज बाद होईल, असे समजते.
माझी चार वर्षाची टर्म बाकी असताना मी फॉर्म का भरला, ते आगामी काळात स्पष्ट होईल. मी राज्यसभेचा अर्ज भरण्याचा आणि अपात्रतेचा काहीही संबंध नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
जाहीर केलेल्या संपत्तीनुसार प्रफुल्ल पटेल हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता तखल ४८३ कोटींवर आहे. अशोक चव्हाण यांची जंगम मालमत्ता १६ कोटी असून, स्थावर मालमत्ता ५१ कोटी ६५ लाख इतकी आहे. गेल्या पाच वर्षात चव्हाण यांच्या मालमत्तेत १८ कोटींची भर पडली आहे. मेधा कुलकर्णी यांच्याकडे २ कोटी ४८ लाखांची स्थावर संपत्ती असून, त्यांची जंगम मालमता २ कोटी ४३ लाख रुपयांची आहे.