- खासदार आढळराव यांना मातोश्रीवरुनच पक्षप्रमुखांचे आशिर्वाद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०१९) :- कोणीही कितीही काहीही म्हटले तरीही धनुष्यबाण सोडणार नाही आणि हाच आशिर्वाद मातोश्रींवरुन घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षप्रमुखांनी दिला आहे. शिवसेना या चार शब्दातच मोठी जादू असून सर्वसामान्यांचे अश्रू पुसून गोरगरिबांना न्याय देणारे शिवसेनेचे सरकार लोकसभेत निवडून आणा. पाणीप्रश्नासह विविध प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. देशाचा विचार करुन मतदान करा, असे मत होम मिनिस्टर फेम व शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी घरकुल चिखली येथे व्यक्त केले.
शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्रामी, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे उपनेते व होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांचा महिला मेळावा घरकुल चिखली येथे आयोजित केला होता. आज चिखली घरकुल येथे महिला मेळाव्यात आमदार महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, जिल्हा संघटक सुलभा उबाळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेविका कमल घोलप, अश्विनी जाधव, योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते.
माजी आमदार लक्ष्मण ढोबळे म्हणाले, महिला वर्गांनी मतदानाच्या रक्षाबंधनांची राखी आज बांधावी. शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून द्यावे. शिवसेनेचे नेते म्हणून तेरा तारखेपासून बाहेर पडताहेत. बांदेकर बांध घालत आहे, याचा अभिमान आहे. युतीचा जाहिरनामा काय आहे? हे सांगितले ज्यांना बाई मधली आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला.ज्यांना बाई मधली बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला बाई मधली प्रेयसी कळली तो राधेचा श्याम झाला आणि पत्नी कळली तो सीतांचा राम झाला, हा आमचा जाहिरनामा आज स्पष्ट करत आहोत. त्यामुळे येणा-या निवडणुकीत धनुष्यबाणाला साथ दया व मोदींना पंतप्रधान करा असे आवाहन त्यांनी केले.











