- ” निवडणुका व्हाव्यात म्हणून लोकांना आंदोलन करावं, असं वाटू नये, हे राजकीय नेतृत्वाचे अपयश”…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- गेली दोन वर्ष महापालिकेत लोकप्रतिनिधीच नाही, प्रशासक हा हुकूमशहा असतो, असे असतानाही महापालिका निवडणूक झाली नसल्याने प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार आयुक्तांच्या हातात एकवटला आहे. तरीही लोकप्रतिनिधी नाहीत, याची जाणीव लोकांना होत नाही, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे. निवडणुका व्हाव्यात म्हणून लोकांना आंदोलन करावं असं वाटू नये, हे राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे, असे परखड मत पुणे महापालिकाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले.ते पुण्यात एका कार्यकमात बोलत होते. यात माजी महापौर तसेच माजी आयुक्त, अधिकारी सहभागी होऊन भूमिका मांडली.
झगडे म्हणाले, राज्यातील अनेक महापालिकांच्या अनेक वर्षे निवडणुकाच झाल्या नाहीत. लोकांचे प्रतिनिधी नसल्याने लोकांना काही फरक पडला का? निवडणुका रोखण्याचा अधिकार अगदी सर्वोच्च न्यायालयालाही नाही. तरीही निवडणुका होत नाहीत. राजकीय नेत्यांना अस्तित्व टिकवायचे असेल तर, निवडणुका झाल्याच पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. इतरही ३५ याचिका प्रलंबित आहेत. निवडणुका रोखण्याचा अधिकार नसला तरी त्यावर न्यायालय निर्णय देत नाही. शासनही निवडणुका घेत नाही.













