- निगडी ते देहूरोडपर्यंत मेट्रोसाठी बोर्डाच्या सभेत ठराव मंजूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- निगडीपर्यंत मेट्रोला केंद्र सरकारच्या मेट्रो कार्पोरेशनच्या वतीने मंजूरी देण्यात आली आहे. निगडी ते देहूरोड अशी मेट्रो करावी, अशा मागणीचा ठराव कँटोन्मेंटच्या बुधवारी (दि. १४) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
देहूरोड बोर्डाची सभा यवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल रावत, नामनिर्देशित सदस्य अॅड. कैलास पानसरे उपस्थित होते.
देहुरोडलगतच्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मेट्रो सुरू असल्याबाबतची माहिती प्रांजल राक्त यांनी सभेत दिली. विषय पत्रिकेवरील मेट्रोच्या या प्रस्तावास अध्यक्ष ब्रिगेडियर कटोच यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे, भविष्यात निगडी ते देहूरोड मेट्रो सेवा सुरू होऊ शकते, अशी आस देहुरोडवासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत मेट्रो अॅथॉरिटीला प्रस्ताव दिला जाईल व पाठपुरावा केला जाईल, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
दरम्यान, कैटोन्मेंट आणि लष्करी हद्दीत मेट्रोसाठी लागणारी जागा पुणे मेट्रो कार्पोरेशन अॅथॉरिटीला देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पुणे-मुंबई महामार्गावरील जुन्या बँक ऑफ इंडिया चौकाजवळील महात्मा गांधी शाळा ही बोर्डाच्या अखत्यारीतील आहे. या ठिकाणी मेट्रोचे स्थानक होऊ शकते, असे नामनिर्देशित सदस्य कैलास पानसरे यांनी सांगितले.















