- महापालिका संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- मोरवाडी, पिंपरी येथील अमृतेश्वर कॉलनीमागील रिकाम्या जागेतील रबर, प्लास्टिक, टायर अशा भंगार साहित्याला बुधवारी (दि.२१) मोठी आग लागली. ती आग इतकी मोठी होती की, दुसऱ्या दिवशी गुरूवारी (दि. २२) विझविण्यात अग्निशमन विभागास यश आले. जागामालक व भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीविरोधात महापालिका नोटीस बजावणार आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अमृतेश्वर कॉलनी येथील मोकळी जागा ही अमृतेश्वर ट्रस्टची आहे. त्या मोकळ्या जागेत औद्योगिक क्षेत्रातील रबर, प्लास्टिक, टायर व इतर भंगार साहित्य आणून टाकले जात होते. या भंगार मालाला बुधवारी दुपारी आग लागली होती. ती इतकी मोठी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी १३ अग्निशमन बंब अपुरे पडले होते. आग धुमसत असल्याने रात्रभर धुर कायम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आगीवर १०० टक्के नियंत्रण मिळविण्यात यश आले.
मोकळ्या जागेत भंगार साहित्य जमा केल्याने आणि आगीस कारणीभूत ठरल्याने महापालिकेकडून जागामालक व संबंधित भंगार व्यावसायिकास नोटीस बजावण्यात येणार आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.











