- थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- देहूगाव नगरपंचायतीचे सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाल्याने अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे देहू नगरपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
काळोखे यांनी निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्यच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दर्शनासाठी येत असतात. इंद्रायणीचे पाणी अंघोळीसाठी देखील योग्य नाही. परंतु, वारकरी हेच पाणी अमृत म्हणून प्राशन करीत असतात. याबाबत देहू ग्रामस्थांनी अनेक वेळा देहू नगरपंचायत, जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; परंतु त्या तक्रारींची नगरपंचायतीने अद्यापही दखल घेतलेली नाही.
याबाबत नगरपंचायतीला पत्रव्यवहार करून आपल्या माध्यमातून या सांडपाण्याची व्यवस्था करता येत नसेल, तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने व्यवस्था करू, असे म्हटले होते. याचीही अद्याप नगरपंचायतीने दखल घेतलेली नाही. त्यामुळे देहू नगरपंचायतविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माऊली काळोखे यांनी केली आहे.











