- महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून दक्षता..
- स्थापत्य आणि विद्युत विभागाला लावले कामाला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- उन्हाळा हंगामाला हळूहळू सुरुवात होत असल्याने शहरातील जलतरण तलाव तांत्रिक कारणांनी बंद ठेवावे लागू नयेत, यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. तलाव चालू स्थितीत असतानाच नियमित देखभाल-दुरुस्तीची कामे करावीत, अशी सूचना स्थापत्य आणि विद्युत विभागाला देण्यात आल्या आहेत.
दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात शहरातील जलतरण तलावांवर पोहणाऱ्यांची गर्दी उसळत असते. मात्र, याच काळात अनेकदा निरनिराळ्या तांत्रिक कारणांमुळे तलाव बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर येत असते. त्यामध्ये, मुख्यत्वे पाणी गळती, अपुरा वीजपुरवठा, जलशुद्धीकरण यंत्रणेतील बिघाड किंवा एखादी दुर्घटना घडल्यास तलाव बंद ठेवावा लागतो. त्यामुळे, नागरिकांचा हिरमोड होतोच. याशिवाय, पालिकेचाही महसूल बुडत असतो. त्यामुळे, यंदाच्यावर्षी हे प्रकार टाळण्यासाठी क्रीडा विभागाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
क्रीडा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच अंतर्गत, पाणी गळतीसारखी अपवादात्मक परिस्थिती वगळता जलतरण तलाव बंद न ठेवता चालू स्थितीत असतानाच त्याची आवश्यक ती देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. पूर्वी, पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी देखील तलाव बंद ठेवले जात असत. काही वेळेस जलशुद्धीकरणासाठी क्लोरिनचे डोस जादा प्रमाणात दिल्याचे प्रकार घडल्याने तलावाचे काही काळापुरते कामकाज थांबवावे लागत असे.
कासारवाडी जलतरण तलावावर क्लोरिन वायूची गळती झाल्यानंतर पालिका यंत्रणेकडून त्याबाबत अधिक सतर्कता बाळगली जात आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या तीन तासांत जलशुद्धीकरण होत आहे. प्रत्येक जलतरण तलावावर दोन मोटारपंप आहेत. मात्र, मोटार खराब होऊन तलाव बंद ठेवावा लागू नये यासाठी तीन तलाव मिळून एक मोटरपंप राखीव ठेवला जाणार आहे.
मागील काही उन्हाळ्याच्या हंगामात जलतरण तलावात बुडून मृत्यु झाल्याचे प्रकार घडले होते. त्यावेळेस, त्या तलावासह सर्व तलाव अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले. त्याने, इतर तलावांवरील नागरिकांची गैरसोय झाली. कुठलीही दुर्घटना घडणे हे दुदैवी आहे. मात्र, तिचा पोलिसांकडून पंचनामा होईपर्यंत किंवा त्या दिवसापुरता संबंधित तलाव बंद ठेवला जावा. इतर तलाव बंद ठेवले जाऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
अपवादात्मक स्थिती वगळता इतर काळात जलतरण तलाव सुरु रहावेत यासाठी आम्ही विद्युत आणि स्थापत्य विभागाला अगोदरच कळविले आहे. त्यानुसार, आता तलावाच्या देखभाल दुरुस्तीची कामे तलाव बंद न ठेवता पूर्ण केली जातील. तीन तलाव मिळून एक मोटरपंप राखीव ठेवला जाईल. तसेच जल शुद्धीकरणाची कामे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत केली जातील.
– मिनीनाथ दंडवते, उपायुक्त (क्रीडा), पिंपरी-चिंचवड महापालिका…











