- ग्रीन झोनमुळे रस्त्यांचा विकास रखडला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२४) :- बोऱ्हाडेवाडी परिसरातील सुमारे ७८ हेक्टर शेतजमीन हरितपट्ट्यात (ग्रीन झोन) असून, त्यावर नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचा विचार सुरु आहे. परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिसादानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. निर्णय झाल्यानंतर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.
या परिसरात मोठ-मोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. मात्र, ग्रीन झोनमुळे रस्त्यांचा विकास रखडलेला आहे. हा पट्टा निवासी पट्टा व्हावा, अशी प्लॉटधारकांची इच्छा आहे मात्र, सुनियोजित विकास व्हावा यासाठी नगररचना योजना राबविण्याचा विचार सुरू आहे.
गायकवाड यांनी सांगितले की, नगररचना योजना हाती घेतल्याने विकास योजनेमध्ये असलेला शेती वापर कोणतेही प्रीमियम न आकारता रहिवास वापरामध्ये बदलण्यात येतो. विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगररचना योजना राबविता येते. त्याअंतर्गत सर्व जमिनींचे एकत्रीकरण करून त्यामधून आरक्षित क्षेत्र काढून घेऊन जमीन मालकीचे प्रमाणात पुनर्वाटप करण्यात येते. पालिकेच्या भूसंपादनासाठी लागणारा खर्च, वेळ वाचतो. शासनाने प्रारूप नगररचना योजनेस मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडे सर्व प्रस्तावित रस्ते, जलनिस्सारण, विद्युतीकरण व पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या जागा बोजाविरहित हस्तांतरित होतात. ज्या जमीनमालकांची जमीन अनियमित आकाराची आहे, बांधकामयोग्य रेखाकन करणे शक्य नाही. अशा जमीनधारकासही नियमित आकाराच्या स्वरूपात अंतिम भूखंड वितरित केला जातो, यात प्रत्येक जमीनमालकास प्रमाणित रुंदीचा प्रवेशमार्ग उपलब्ध करून दिला जातो,
महापालिकेच्या २००८ च्या मंजूर ठरावानुसार कलम ३७ अन्वये शेती वापर जागा निवासी पट्ट्यामध्ये बदलण्यासाठी असलेल्या ठरावाबाबत आताच्या २०२४ च्या लोकसंख्येनुसार आरक्षणे वाढणार आहेत. यापूर्वी २००८ नुसार ७ आरक्षणे होती. त्यात वाढ होणार असून मोजकेच शेतकरी बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची की तोट्याची याबाबत लवकरच नगररचना विभाग शेतकऱ्यांची बैठक घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.











