- अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२४) :- मा. खा. शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर महायुतीचा जो उमेदवार ठरेल, त्याचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. यावरून आढळराव यांनी आगामी शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा सोडल्याचे बोलले जात आहे; मात्र उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. तसेच महायुतीत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता, अजूनही तो कायम आहे. शिरुरमध्ये सध्या तरी अजित पवारांना उमेदवार सापडलेला नाही. तसेच शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी नाकारली तर, आढळराव पाटील हे अपक्ष उभे राहणार हे निश्चित झाले आहे, अशा परिस्थितीमध्ये शिरुरला तिसरा उमेदवार कोण असणार? याकडे लक्ष लागले आहे.
आढळराव यांनी बुधवारी पुणे गृहनिर्माण प्राधिकरणाच्या क्षेत्रविकास (म्हाडा) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हें; तसेच ‘म्हाडा’ चे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते. आढळराव यांची ‘म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्याबाबत ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे नाही. अध्यक्षपदासाठी दीड वर्षापासून चर्चा सुरू होती. कामाच्या व्यापामुळे त्याचा फारसा पाठपुरावा करता आला नाही. त्यामुळे नेमणुकीस उशीर झाला,” त्यामुळे लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, ही चर्चा त्यांनी फेटाळून लावली, मी या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलो आहे. माझी जनतेशी नाळ जुळली आहे. या मतदारसंघात मी फिरत आहे; मात्र तिकिटाच्या लालसेने फिरत नसून तिकीट मिळाले नाही तरी मी मतदारसंघात फिरतच राहीन, असा दावाही त्यांनी यावेळी केला. आढळराव यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर तोंडसुख घेतले. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी कोल्हे मी मंजूर केलेली कामे स्वतःची कामे म्हणून दाखवितात. मी अनेक आंदोलने केली आणि ते श्रेय घेतात, अशी टीकाही केली.
तिकीट मिळाले नाही तरी माझे काहीही बिघडणार नाही, असे सांगून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाच्या पुढे नाही, असेही सांगितले. ‘मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. या जागेचा निर्णय अद्याप ठरला नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूरला आढळरावच उमेदवार असतील, असे स्पष्ट केल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार तडजोड कुठे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.











