- वाळू डेपो नसल्याने पिंपरी चिंचवडकरांना वाळू महागच मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- राज्यातील नागरिकांना घर बांधण्याकरता स्वस्त दराने वाळू मिळावी, नदीकाठच्या भागात होणारे अनधिकृत वाळू उपसाला आळा घालण्यासाठी शासनाने नवे धोरण जाहीर केले. त्यामुळे सहा ते सात हजारांना मिळणारी एक ब्रास वाळू आता केवळ ६०० रुपयांत मिळणार आहे. असा शासन निर्णय १९ एप्रिल २०२३ रोजी झाला, मात्र, निर्णयाची पिंपरी चिंचवड शहरात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना जास्त दरानेच वाळू खरेदी करावी लागत आहे.
महाराष्ट्रात नवे वाळू धोरण लागू झाल्यानंतर राज्यातील वाळुपट्ट्यांची लिलावपद्धती शासनाकडून बंद करण्यात आली, वाळूच्या उत्खननासाठी शासनाकडून नदीपात्रातील वाळूपट्टे निश्चित केले असून त्यानंतर वाळुचे उत्खनन सुरू केले. नदीपात्रातील वाळू काढून ती तालुकास्तरावरील वाळू डेपोत साठवण्यात येत आहे. तेथून नागरिकांना वाळुची विक्री करण्यात येत आहे. मात्र, महसूल विभागाने पिंपरी चिंचवड शहरात अद्याप डेपोच तयार केलेला नाही. तसेच शहरात वाळू उपसा ठिकाणे नसल्याने बाजू डेपो तयार करता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑनलाईन पद्धतीने रेती वाळू नोंदणी करता महा सेवा केंद्र अथवा आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो. किंवा www.mahakhanij maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ळावर ऑनलाइन प्रोफाइल झाल्यानंतर वाळू बुकिंगसाठी अर्ज करता येतो. तसेच स्टॉक यार्ड डिटेल्स ही पाहता येतात, त्यावर क्लिक करून आपल्या जिल्ह्यामधील डेपो तसेच वाळू शिल्लक किती आहे, हे पाहता येते.
पिंपरी चिंचवड परिसरात साधारणपणे साडेआठ हजार रूपये ब्रास अशा दराने वाळू पोहच मिळत आहे. ही वाळू शिरूर तालुक्यातील निमोणी येथून आणली जाते. शहरापासून लांब असलेल्या ठिकाणावरून ही वाळू आणली जात असल्याने ती महाग मिळते, असे वाळू वाहतूकदार सांगत आहेत. तसंच ६०० रूपये ब्रास या स्वस्त दराने शासनाने सुरू केलेले घर पोहच वाळू धोरण बंडल असून या ऑनलाइन प्रणालीत वाळूची मागणी करणे खूप त्रासदायक आहे. या प्रणालीनुसार मागणी करणाऱ्या सर्वांनाच वाळू मिळत नाही, असे वाळू वाहतूकदारांचे म्हणणे आहे.
पिंपरी चिंचवड शहरात वाळू उपसण्यासाठी ठिकाणे नाहीत. त्यामुळे शहरात वाळू डेपो तयार करणे शक्य नाही. इतर ठिकाणावरून वाळू आणल्यास ती शहरातील नागरिकांना महाग मिळू शकते.
– प्रविण ढमाले, नायब तहसीलदार…