- उद्धव ठाकरेंकडून नावाची घोषणा; भाजपकडून श्रीरंग बारणे?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. गेली १५ वर्ष शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. आता शिवसेनेची दोन भागात विभागणी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मावळ लोकसभेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करत कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. लोकसभेकरिता आपला उमेदवार जाहीर करून उद्धव ठाकरे गटाने उमेदवारीत बाजी मारल्याचे दिसत आहे. सोमवारी (दि. ४) उद्धव ठाकरे यांनी पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांची उमेदवारी घोषित करून मावळ मतदार संघावर पुन्हा भगवा फडकविण्याचे आवाहन केले.
राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीमधील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मावळ लोकसभा मतदारसंघावरून ताणाताणी सुरू असल्याचे दिसते. १५ वर्षांपासून मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यावेळी मावळमध्ये कमळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. तर, शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगतानाच चिन्ह सांगणे खुबीने टाळतात. त्यामुळे बारणे हे कमळावर निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मावळ मतदारसंघातील सलग तीन निवडणुका शिवसेनेने जिंकल्या आहेत. परंतु, आता शिवसेनेचे दोन गट झाल्याने भाजपने आक्रमकपणे मावळवर दावा केला आहे. मावळमध्ये भाजपची सर्वाधिक ताकद असल्याचे सांगत हा दावा जोरकसपणे केला जात आहे. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेले पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येतात. चिंचवडच्या अश्विनी जगताप, पनवेलचे प्रशांत ठाकूर हे भाजपचे तर उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी भाजपशी संलग्न आहेत. पिंपरी-चिंचवड, पनवेल या दोन महापालिकांमध्ये भाजपची सत्ता होती. तळेगाव दाभाडे, लोणावळा यांसह चार नगरपरिषदाही भाजपकडे होत्या. शेकडो ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मावळमध्ये एकदा कमळावर निवडणूक लढविली पाहिजे.
कमळाच्या चिन्हावर मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे. १५ वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आता भाजपला मिळावा अशी मागणी वरिष्ठांकडे केली असल्याचे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांचा नामोल्लेख टाळत आमचा कोणालाही विरोध नाही. पण, कमळ चिन्ह असावे. पक्षश्रेष्ठी ज्याला उमेदवारी देतील, त्याला दोन लाख मतांच्या फरकाने निवडून आणले जाईल, असाही विश्वास व्यक्त केला. याशिवाय गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही मावळमध्ये कमळ फुलले पाहिजे असा आग्रह असल्याचे कर्जत येथील आढावा बैठकीत सांगितले.
भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तीन वेळा निवडून आले आहेत. एकवेळा काँग्रेस आणि सलग दोनवेळा भाजपकडून आमदार आहेत. पुढील वेळी विधानसभेला निवडून आल्यास आणि महायुतीची सत्ता कायम राहिल्यास मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदारी राहील, यामुळे ते लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जाते. चिंचवडच्या अश्विनी जगताप यांना आमदार होऊन एकच वर्षे झाले. त्यामुळे त्याही लढण्याची शक्यता नाही. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे आणि पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची लोकसभा लढविण्याची तयारी दिसते. भेगडे यांचा २०१९ मध्ये विधानसभेला पराभव झाला आहे.
राष्ट्रवादीचे सुनील शेळके मावळचे आमदार असल्याने विधानसभेला त्यांनाच जागा सुटेल या शक्यतेने भेगडे यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मतदारसंघ भाजपला सुटणार की शिवसेनेकडेच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघ भाजपला सुटल्यास विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे त्यांनाही धनुष्यबाणाऐवजी कमळावर निवडणूक लढविणे सोपे राहील, असे बोलले जाते.











