- श्री क्षेत्र देहू ते भंडारा डोंगर अशी शटल बससेवाही हवी..
- देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांची पीएमपीएमएलकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- श्री क्षेत्र देहूला चाकण (येलवाडी मार्गे) आणि देहू ते तळेगाव दाभाडे अशी पीएमपी बस सुरु करावी. तसेच श्री क्षेत्र देहू ते भंडारा डोंगर अशी शटल बससेवाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी देहू नगरपंचायतचे नगरसेवक प्रवीण काळोखे, नगरसेवक मयूर शिवशरण, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोर, बाळासाहेब काळोखे, अमोल नाणेकर आणि इतर मान्यवर नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देहू हे वारकरी संप्रदायाचे राज्यातील एक प्रमुख आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. आषाढी, कार्तीकीसह वर्षभर हजारो भाविक भक्त देहू नगरीत येऊन जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेत असतात. यासह देहूत आलेल भाविक जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भंडारा डोंगर या तीर्थक्षेलालाही भेट देऊन दर्शन घेतात. परंतु, या ठिकाणी जाण्याकरिता भाविकांना सार्वजनिक प्रवासाची कोणतीही सोय नाही. खाजगी वाहनाने ज्यादा दरात भाविकांना प्रवास करावा लागत आहे. तसेच अहमदनगर, खेड, शिरूरमार्गे येणाऱ्या भाविकांना चाकणपासून पुढे थेट देहूला येण्यास बस नसल्याने, खूप अडचणीचा सामना करत देहुला यावे लागत आहे. यासह तळेगाव दाभाडे, चाकण, महाळुंगे येथील नागरिक देहू नगरीत येत असतात. कामगारवर्ग देखील मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे चाकण (येलवाडी मार्गे) देहू आणि देहू ते तळेगाव दाभाडे, अशी पीएमपी आणि श्री क्षेत्र देहू ते भंडारा डोंगर अशी शटल बससेवाही सुरू करण्यात यावी, असे नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी निवेदनत म्हटले आहे.