- म्हणाले, तर.. ‘शरद पवार म्हणतात मला’..
- आमदार सुनील शेळकेंचेही पवारांना जशास तसे उत्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२४) :- ” माझ्याबाबतीत शरद पवारांनी असं विधान का केले? हे मी त्यांना भेटून विचारणार आहे. जर माझे काही चुकले तर, मी जाहीर माफी मागेन. पुढच्या ८ दिवसांत ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांनी साहेबांना सांगावे. नाहीतर मी राज्यभरात साहेबांनी माझ्याबाबतीत मतदारसंघात येऊन चुकीचे वक्तव्य केले? हे सांगेन, असं आव्हान आमदार सुनील शेळकेंनी शरद पवारांना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं असून स्वतः शरद पवार यांनी आज मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने शरद पवारांना हार घालण्यात आला.
शरद पवार म्हणाले, मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदाराने (मावळचे आमदार सुनील शेळके) आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते.
इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला, असा इशाराच शरद पवारांनी आपल्या भाषणात सुनील शेळकेंना दिला.
त्यावर आमदार सुनील शेळके म्हणाले की, शरद पवारांनी आजपर्यंत कधी कुणावरही असं विधान करताना मी पाहिले नाही. व्यक्तिगतही टिप्पणी केल्याचे पाहिलं नाही. परंतु माझ्याबाबतीत असं का बोलले हे भेटून विचारणार. कुणी माहिती दिली, माझे काय चुकले हे मी नक्कीच विचारणार आहे. पुढच्या काळात मलाही सांभाळून काम करावे लागेल. सत्ता, पद, प्रतिष्ठा ही क्षणिक आहे. ज्या मावळच्या मायबाप जनतेने माझ्यावर प्रेम केले ते आजही माझ्यासोबत आहेत. राजकारणात भविष्यात काय होईल याची मी पर्वा करत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार इथं आले होते. ज्यांनी हा मेळावा आयोजित केला त्यांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली. शेकडो कार्यकर्ते अजित पवारांची साथ सोडून आपल्याकडे यायला तयार आहेत. आपण आलात तर पक्षप्रवेश करून त्यांना सन्मानित करायचे आहे. शेकडो कार्यकर्ते सांगितले आणि केवळ ३५-४० कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. ठाकरे-काँग्रेसचे कार्यकर्ते मेळाव्याला होते. संपूर्ण कार्यक्रमाचा फज्जा उडतोय हे पाहून आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली. सुनील शेळकेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशाप्रकारे धमकी दिली असं सांगितल्यानंतर शरद पवारांनी हे विधान केले असंही शेळकेंनी सांगितले.
दरम्यान, मागील ६ महिन्यापूर्वीच्या घडामोडीचा मीदेखील साक्षीदार आहे. भाजपात जाण्यासाठी कोण कोण आग्रही होते. त्यातून अजितदादांना ऐनवेळी तोंडघशी पाडणे हे पाहिले आहे. त्यामुळे अजितदादांना टार्गेट करून रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे नेते होऊ शकत नाही. शेवटी दादाच्या कामाचा आवाका, ३०-३५ वर्षाचे योगदान माहिती आहे. स्वत:च्या स्वार्थासाठीच राजकारण करायचे असेल तर आम्हालाही जाहीरपणे बोलले पाहिजे, असा इशारा सुनील शेळकेंनी दिला आहे.











