- ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या खासगी अॅप्सवर होणार कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२४) :- पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या खासगी अॅप्सवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कॅब ड्रायव्हर आणि रिक्षा चालकांनी आपला बंद तात्पुरता स्थगित केला आहे.
पुणे आरटीओने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार (कुलकॅब) वातानुकूलित टॅक्सीकरिता काळी – पिवळी टॅक्सीच्या दरापेक्षा २० टक्के जादा भाडेवाढ देण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार १ जानेवारीपासून भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांकडून कॅबचालक, मालकांना नवीन दरानुसार पैसे दिले जात नाहीत.
त्याविरोधात इंडियन गिगवर्कर्स फ्रंटने ५ मार्च रोजी बंदची हाक दिली होती. यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ऑनलाइन सेवा देणाऱ्या कॅब आणि रिक्षा चालकांनी बेमुदत संप सुरू केला होता. आरटीओ प्रशासनाने उबरची एव्हरेस्ट फ्लीट व इतर कॅब कंपन्यांच्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी अॅप्सवर कारवाईसाठी पोलिस महासंचालक सायबर सेल यांना पत्र पाठवले. आरटीओ प्रशासनाच्या आश्वासनानंतर इंडियन गिगवर्कर्स फ्रंटने बंद मागे घेतला आहे.















