न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०१९) :- पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत एकूण ७६ पदांना ३० सप्टेंबरपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एकूण २३ पदांचा समावेश आहे.
राज्याच्या गृह विभागाने या मुदतवाढीला नुकतीच मान्यता दिली आहे. राज्यभरातील एकूण ८१२ अस्थायी पदांना २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एकूण २३ पदांचा समावेश होता. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा या पदांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत या सर्व पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड कार्यालयात सर्वाधिक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही संख्या पाच इतकी आहे. याखालोखाल वरिष्ठ श्रेणी लिपिक, सहाय्यक रोखपाल, वाहनचालक, शिपाई व पहारेकरी यांची प्रत्येकी दोन पदे आहेत. याशिवाय मुख्य लिपिक (ग्रामीण), कनिष्ठ लेखापरीक्षक, लेखापाल (ग्रामीण), मुख्य रोखपाल, लिपिक टंकलेखक, वाहन तपासणीस, नाईक आणि स्वच्छक या संवर्गातील प्रत्येकी एका पदाचा समावेश आहे.











