न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२४) :- पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून नदी पुनरुच्चीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी आवश्यक केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्राची (सीडब्ल्यूपीआरएस) मान्यता घेऊन नव्याने अर्ज सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने (एसईआयएए) महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने पडताळणी करून घेतली असून आता मान्यतेसाठी अर्ज केला जाणार आहे.
शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. तीनही नद्यांसाठी एकूण तीन हजार ५०६ कोर्टीचा खर्च महापालिका करणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्याच्या खर्चासाठी महापालिकेने दोनशे कोटींचे कर्जरोखे २७ जुलै २०२३ रोजी काढले आहे. वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या मुळा नदीच्या विकासासाठी हा निधी वापरण्याचे नियोजन आहे.
नदी पुनरुजीवन प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाच्या राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची (एसईआयएए) मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने परवानगीचा अर्ज केला होता. परंतु, तो फेटाळण्यात आला. नदीचे पुनरुज्जीवन करताना पूर पातळी वाढणार नाही. भारतीय मानकशास्राचे पालन करावे. नदीची वहन क्षमता कमी होता कामा नये, नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे, पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याबाबत केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र यांच्याकडून पडताळणी करावी. त्यानंतरच अर्ज मंजुरीसाठी पाठविण्याची सूचना एसईआयएएने केली आहे.
एसईआयएएने सांगितल्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता केली आहे. सीडब्ल्यूपीआरएस यांच्याकडून पडताळणी करून घेतली आहे. त्यानुसार मंजुरीसाठी अर्ज केला जाईल.
– संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग…















