- शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे यांची पक्षश्रेष्ठींकडे आर्जव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा दाखल केला असून जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांना राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी आज मंगळवारी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पुणे इन्स्टिट्यूट डायरेक्टर चेतन गवळी, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष सागर बोराटे, प्रशांत सपकाळ, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंखे, गणेश गायकवाड, संकेत जगताप, भागवत जवळकर, ओंकार विनोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ” अजित पवार यांनी आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात केलेली विकासकामे आणि त्यांची निर्णयक्षमता, विश्वासार्हता यामुळेच शहराचा एवढा मोठा विकास झाला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार नाना काटे यांना सुमारे १ लाख मते मिळालेली आहेत. या जोरावर पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठी मावळ लोकसभा मतदार संघ स्वतःकडे घ्यावा. तसेच जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांना मावळची उमेदवारी द्यावी. त्यांचा मावळ भागात चांगला जनसंपर्क व नातीगोती असून उरण, कर्जत व पनवेल मतदार संघांमध्ये देखील त्यांचा पूर्वीपासून संपर्क आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडावा आणि भाऊसाहेब भोईर यांना मावळची उमेदवारी द्यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे ”.
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, ” जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. सन १९९२ साली महानगरपालिकेवर नगरसेवकपदी ते पहिल्यांदा निवडून आले होते. तेव्हापासून सलग ५ वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून येत आहेत. नुकतेच त्यांनी १०० व्या ऐतिहासिक नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे, पक्षाची ताकद, भाऊसाहेब भोईर यांची दीर्घ कारकीर्द पाहता मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांच्यासाठी निश्चितपणे योग्य राहील.











