- पालखी महामार्गावरील रस्ता रुंदीकरण करा; देवेंद्र फडणवीसांना साकडं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२४) :- ‘‘देहू ते देहूरोड या कॅन्टोन्मेंट आणि देहू नगरपंचायत हद्दीतील ५ किलोमीटर पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध करून त्याचे २०२४ मधील पालखी सोहळ्यापूर्वी रुंदीकरण करण्यात यावे,’’ अशी मागणी हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथे वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच देहूची लोकसंख्या ५० हजार पेक्षा जास्त आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीही देहूला येऊन गेले आहेत. दिवसेंदिवस देशभरातील हजारो भाविक, पर्यटक देहूत येत आहेत. मात्र, या भाविकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. रस्ते अपुरे आहेत. पुरेशा आरोग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत.
वर्षभरापूर्वी देहू येथे नगरपंचायत स्थापन करण्यात आली. मात्र, या नगरपंचायतीमध्ये प्रशासकीय मुख्याधिकारी कायमस्वरूपी नसल्याने अनेक नागरी विकासाची कामे रखडलेले आहेत. मुख्याधिकारी सहा महिन्यांपासून रजेवर आहेत. प्रभारी मुख्याधिकारी ठोस निर्णय घेत नाहीत. प्रशासनाकडून उपलब्ध निधी कसा खर्च होतो ? याची माहिती नागरिकांना मिळत नाही.
देहू – देहूरोड पालखी मार्गावर पडलेल्या शेकडो खड्ड्यांमुळे भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने देहू ते देहूरोड पालखी मार्गाचे रुंदीकरण लवकर होण्याची गरज आहे. त्याकरता शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी गोलांडे यांनी केली आहे. याखेरीज, देहू नगरपंचायतीमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा, नगरपंचायत इमारतीसाठी निधी द्यावा, प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या वाढवावी, पाणी योजना, अंतर्गत रस्ते यासाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, असे सुहास गलांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.











