न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२४) :- पिंपरी- चिंचवड शहरात मोक्याच्या ठिकाणी, सिग्नलवर, उड्डाणपुलाखाली, बस थांब्यांवर, विद्युत खांबावर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. अनधिकृत होर्डिंग्ज, बैनर्स, किऑस्क लावण्यास निर्बंध असताना त्यांच्यावर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुढत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत परवानगी न घेता बेकायदेशीर बॅनर्स, होर्डिग्न लावत आहेत, तरीही पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून होर्डिंग काढले जात नाहीत. सगळे नियम धाब्यावर बसवून होर्डिंग लावत शहराचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुढाऱ्यांकडून चौका-चौकात होर्डिंग्ज, फ्लेक्स, किऑस्क लावले जात आहेत. राजकीय व्यक्तींचे पाठबळ मिळत असल्याने अनधिकृत जाहिरातीचे पीक जोमात आहे. यामुळे मागील कित्येक वर्षांपासून पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत आहे.
तसेच, आकाशचिन्ह व परवाना विभागाने मागील सहा वर्षात विद्युत खांबांवर लावलेल्या किऑस्क बॉक्सची निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब केला आहे. त्यामुळे शहरातील जाहिरात एजन्सीधारक अनधिकृतपणे विद्युत खांबांवर विविध व्यावसायिकांचे किऑस्क लावून फुकटची जाहिरात करत आहेत. त्यात बांधकाम व्यावसायिकांच्या सर्वाधिक जाहिराती दिसून येत आहेत. त्यांच्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
- महापालिकच्या हद्दीत किऑस्क लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. असे प्रकार आढळून आल्यास क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संबंधितांवर कारवाई केली जाते. यापूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. अशाच काही प्रकरणात दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. यामुळे कारवाई टाळण्यासाठी परवानगी घेऊनच जाहिरात करावी.
– संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग..











