- आर्थिक लाभ मिळत नसल्याने हजारो माता लाभापासून वंचित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२४) :- राज्यात माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सात वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे. पण, या योजनेचा आर्थिक लाभ मात्र मिळत नसल्याने पुण्यात हजारो माता लाभापासून वंचित आहेत. केंद्र शासनाच्या लालफितीच्या कारभाराचा फटका गर्भवतींनाही बसला आहे. त्यामुळे सुदृढ बालके जन्मणार तरी कशी, असा प्रश्न यानिमिताने उपस्थित होत आहे.
गर्भवती महिलांना अनेकदा गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसारखी कामे करावी लागतात, त्यामुळे गर्भवतीना पोषक आहार मिळत नाही. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, यासाठी राज्यात २०१७ ला ही योजना राबवण्यात आली खरी; परंतु त्याचा निधी केंद्राकडून राज्याला येतो, मात्र, केंद्राकडून अनेक दिवसांपासून हा निधी न आल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला पहिल्या अपत्यासाठी ५ हजार रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये, तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात ६ हजार रुपयांचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात डीबीटीद्वारे जमा केला जाणे अपेक्षित आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलेचे कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, या महिलेने किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांचे वय किमान १८ वर्ष ते कमाल ५५ वर्षादरम्यान असावे लागते. तसेच खासगीमध्ये उपचार घेत असल्यास सरकारी रुग्णालयांत नोट करून आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून द्यावा लागतो. यानंतर पहिल्या अपत्यास दोन टप्प्यांत तर दुसऱ्या अपत्यास एकाच टप्प्यात लाभ मिळतो.
या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून ६० टक्के आणि राज्य शासनाकडून ४० टक्के निधी मिळतो. पूर्वी ते अनुदान केंद्रस्तरावरून महिलांच्या खात्यात वितरित होत असे. परंतु, गेल्या ऑक्टोबरपासून आता राज्याच्या कुटुंबकल्याण कार्यालयाकडून हे अनुदान वितरित केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार ५०० महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे, तर १८ हजार महिलांना आर्थिक लाभ मिळणे बाकी आहे. महिलांना लाभ न मिळण्याची तीन कारणे असून, त्यामध्ये केंद्राने यासाठी नवीन अॅप लॉन्च केल्यामुळे जुने लाभार्थी वंचित आहेत. तर अपूर्ण व चुकीचे भरले गेलेले अर्ज, आधार नसणे व डीबीटी इनेबल्ड नसणे या कारणांमुळेही लाभ मिळत नाही.
– वरिष्ठ अधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग











