न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२४) :- मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावात वर्षभरापूर्वीच काही कोटी रुपये खर्चून पुलाची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत शेजारीच असणाऱ्या या पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ असते.

चाकण एमआयडीसीकडे जाणारा कामगार वर्ग, सिद्धांत कॉलेजकडे जाणारे विद्यार्थी, भक्त-भाविक आणि नागरिक याच पुलावरून सारखे ये-जा करीत असतात. दरम्यान पुलाच्या देखभाल आणि स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
या पुलावर असणाऱ्या पाण्याच्या पाईपमधून पाण्याची गळती होत आहे. साचलेल्या मातीचा चिखल होऊन त्यात मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. त्यामुळे पूल कमकुवत होऊन पुलाला धोका पोहोचू शकतो. या पुलाची नियमित स्वच्छता आणि देखभाल केली जावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.











