न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२४) :- मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील गृहनिर्माण संस्थांमधून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यावर मानांकानुसार पाणी पुरवठा होत असल्याचा दावा करत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत गृह निर्माण संस्थांना पत्र पाठविण्यात आले आहे. भूमिगत, इमारतीवरील टाक्यांच्या गळतीबाबत पाहणी करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.
आपल्या सोसायटींमधून पाण्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. मात्र, आम्ही ठरलेल्या मानांकानुसार सोसायटीला पाणी पुरवठा करत आहोत. याबाबतचा गेल्या १० ते १२ दिवसातील मीटर रिडिंगचा तक्ताही संबंधित सोसायटीच्या पदाधिका-यांना पाठविण्यात येत आहे. तसेच सोसायटीमधील भूमिगत टाक्या व टेरेसवरील टाक्यांची गळतीबाबत पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सोसायटी अंतर्गत असलेल्या सांडपाणी प्रकल्प सुरू ठेवावेत. बोअरवेलचे पाणी स्वच्छतागृहे, उद्यान व इतर कामासाठी वापरावे. सोसायटी स्तरावर पाणी काटकसरीने व जपून वापरण्याबाबत सोसायटी सभासदांमध्ये जागरुकता करावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.











