- चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२४) :- शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये येऊन काही स्थानिक गुंड सदस्यांना मारहाण करत आहेत. दमदाटी करणे, वाहनांचे नुकसान करण्याचे प्रकारही घडत आहेत. अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने योग्य कारवाई करून गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबतचे निवेदन त्यांनी पाठवले आहे. सांगळे यांनी पोलिस आयुक्त व गृहमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच सोसायट्यांमध्ये काही स्थानिक गुंडांकडून सदनिकाधारक व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी केली जात आहे. प्रसंगी मारहाण करून धमक्याही दिल्या जात आहेत. याबाबत पोलिस ठाण्यांत व्यवस्थित तक्रार नोंदवून घेतली जात नाही. नोंद केल्यास चौकशी व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे वारंवार दमदाटी व मारहाणीच्या प्रकारांचा सामना सोसायटीधारकांना करावा लागत आहे. सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यालाही प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र विभाग करावा. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची विशेष नेमणूक करावी, जेणेकरून तक्रारींची नोंद घेऊन लवकरात लवकर कारवाई करता येईल, असेही सांगळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दोन मार्च रोजी पिंपरीतील महिंद्रा अंथिया सोसायटीत सेक्रेटरीला बाहेरील गुंडांकडून जबर मारहाण झाली आहे. त्याबाबतच्या तक्रारीवर पोलिसांनी योग्य कारवाई केलेली नाही. उलट मारहाण झालेल्यांचीच चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अशाच घटना चिखली, मोशी, चऱ्होली, पिंपरी, पुनावळे, पिंपळे सौदागर, सांगवी, रावेत भागातील सोसायट्यांमध्ये घडल्या आहेत.











