न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२४) :- रेसिडेन्सीमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या पथकाला सात जणांना बंद पडलेल्या लिफ्टमधून बाहेर काढण्यात यश आले. ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री घडली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, रॉयल रेसिडेन्सीमधील हणमंत गुब्याड यांनी अग्निशामक दलाच्या पथकाला रात्री ९ वाजता दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेत तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये अडकलेल्या सातजणांना रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सुखरूप बाहेर काढले.
लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये फयाज (वय १० कुदळवाडी), अंबादास हांडे (६२ जुन्नर), वसंत सातपुते (५७, संगमनेर) महादेव सातपुते (६०, पुणे) सोन्या सातपुते (५७, संगमनेर) जगन्नाथ सातपुते (५४, संगमनेर) दिलीप भालके (५७, मोशी) यांचा समावेश होता.
विठ्ठल सपकाळ, अमोल चिपळूणकर, चंद्रकांत चव्हाण विकास कुटे, महेश इंदलकर, दीपेश दिवेकर, योगेश ढोले या महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका केली.















