- प्रशासनाकडून निविदा काढण्यास विलंब; निकोप स्पर्धेला तिलांजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील निवासी व बिगर निवासी नळ जोडला लावलेल्या मीटरची तपासणी करून बिल अदा करण्यासाठी ‘कॅनबेरी एनएक्स सर्व्हिसेस’ ही एजन्सी काम करीत आहे. त्यांच्या कामाची ५ वर्षे संपली तरी, त्यांना सन २०२१ पासून आतापर्यंत तब्बल सातवेळा मुदतवाढ बहाल करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाला निविदा काढण्यास वेळ मिळत नसल्याने एकाच एजन्सीला पोसण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
घरोघरी जाऊन पाणी मीटरची तपासणी करून बिले देण्याचे काम भाजपच्या सत्ताकाळात कॅनबेरी एजन्सीला २५ फेब्रुवारी २०१६ ला देण्यात आले. ही मुदत २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५ वर्षांसाठी होती. त्यासाठी तब्बल १६ कोटी ७ लाख २५ हजार २५४ खर्च झाला. ती पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर निविदा काढली गेली नाही. त्यानंतर तीन ते सहा महिन्यांची तब्बल सात वेळा मुदतवाढ त्या एजन्सीलाच देण्यात आली आहे. नवीन मुदतवाढ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतची आहे.
या सहा महिन्यांच्या मुदतवाढीसाठी २ कोटी ६० लाखांचा खर्च आहे. त्या मुदतीला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची नुकतीच मान्यता दिली आहे. एकाच संस्थेला मुदतवाढ देण्याच्या प्रशासनाच्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या नव्या तंत्रज्ञानानुसार नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला विलंब होत असल्याने मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कारण प्रस्तावात देण्यात आले आहे.
येत्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ पासून मालमत्ताकरात पाणीपट्टी समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मालमत्ताकर बिलासोबतच पाणीपट्टी भरणे सुलभ होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी जाहीर केले आहे. मालमत्ताकराची बिले महिला बचत गटांकडून घरोघरी जाऊन वाटली जातात. त्यामुळे स्वतंत्रपणे पाणीपट्टी बिले वाटपाच्या खर्चात बचत होणार आहे.