न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १८ मार्च २०२४) :- अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील भीमा शंकर सोसायटी जवळून गायरानाकडे जाणारा व देहू आळंदी रस्त्यावरील बाह्यवळण रस्ता या दोन रस्त्यांना जोडणारा डीपी मंजूर रस्ता, बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राच्या भूसंपादनाबाबत व दिव्यांग बांधवांना एका निवासी मिळकतीला घरपट्टीमध्ये ५० टक्के सूट देण्याबाबतचा ठराव करण्यात आला.
श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या कार्यालयात सोमवारी (दि. ११) रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा पूजा दिवटे, सुधीर काळोखे, गटनेता, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे व सर्व विभागांचे प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत हे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामुळे या भागात राहणाऱ्या रहिवाशांचा रस्त्याच्या व पाण्याच्या प्रश्नाबाबतचा वनवास लवकरच संपणार असल्याने या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
देहूगावातील भीमाशंकर सोसायटीकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून डीपीमध्ये मंजूर होता. मात्र, हा रस्ता यासाठी नगरसेवक योगेश काळोखे यांनी देहू नगरपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. त्याचप्रमाणे बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राच्या जवळील पंपिंग हाउसची जागादेखील भूसंपादन करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. भीमाशंकर सोसायटीमार्गे गायरान मारुती काळोखे चौक ते परंडवाल चौक बाह्यवळण रस्ता हा नियोजीत डीपीमध्ये २४ मीटर रुंदीचा होता. मात्र. या रस्त्यांच्या रेखांकनामुळे या भागात राहणाऱ्या काही रहिवाशांची घरे बाधित होत होती. परिणामी या भागातील रहिवाशांना बेघर व्हावे लागले असते, याची दखल घेत योगेश काळोखे यांनी काही दिवसांपूर्वी या रस्त्यांची रुंदी २४ मीटरऐवजी १२ मीटर करावी व या रस्त्याच्या रेखांकनात बदल करावा अशी लेखी मागणी केली होती. रस्ता मोकळ्या जागेतून जाणार असून, रहिवाशांची घरे बाधित होणार नाही. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
देहूगाव नगरपंचायत हद्दीत दिव्यांग बांधवांसाठी एका निवासी मिळकतीला घरपट्टीमध्ये ५० टक्के सूट देण्याबाबतचा विशेष ठरावदेखील पारित करण्यात आला. देहूची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, येथील पाणीपुरवठा योजना व जलशुद्धीकरण प्रकल्प कमी पडत आहे. बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राचे विस्तारीकरण करण्यासाठी जागेची आवश्कता होती. या जलउपसा केंद्राच्या जवळ असलेली जागा खाजगी मालकीची असल्याने या जागेचे भूसंपादन झाल्याशिवाय या योजनेचा विस्तार करणे शक्य नव्हते, त्यामुळे या जलउपसा केंद्राच्या पंपिंग हाउसला लागून असलेली खाजगी जागा संपादित करण्यासंदर्भात ठरावही मंजूर करण्यात आला.