न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- महापालिकेतील सात उपअभियंत्यांची कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यांची वेगवेगळ्यातील रिक्त पदांवर नियुक्ती केली आहे.
महापालिकेत कार्यकारी अभियंत्यांची (स्थापत्य) २४ पदे मंजूर आहेत. त्यातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी एक मार्च २०२४ रोजी पदोन्नती सभा झाली. त्यात रिक्त पदांवर उपअभियंत्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, स्थापत्य अभियंत्ता संवर्गातील सेवाज्येष्ठता व पदोन्नती संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंता वैशाली ननावरे (स्थापत्य विभाग मुख्य कार्यालय), राजेंद्र मोराणकर (पाणीपुरवठा), विजय वाईकर (फ क्षेत्रीय स्थापत्य), बरविंदरसिंग बन्सल (पर्यावरण), सतीश वाघमारे (ह क्षेत्रीय कार्यालय), विजय जाधव (उद्यान स्थापत्य) यांना सेवा ज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. उपअभियंता देवेंद्र बोरावके (ई क्षेत्रीय कार्यालय) यांना एक एप्रिलपासून प्रत्यक्ष पदोन्नती दिली जाणार आहे.
महापालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०२० मधील पदोन्नतीने नेमणूक करणे, या नियमातील महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ४५ अंतर्गत येणारी तसेच, इतर वर्ग एकची पदे पदोन्नतीने भरताना त्यांना सरकारची पूर्वमंजुरी आवश्यक राहील, अशी अट आहे. ती शिथिल करण्यासंदर्भात २० ऑगस्ट २०२० रोजी सरकारला कळविले आहे. त्यांवर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. मात्र, महापालिका प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी व वेगवेगळ्या विभागांची आवश्यकता विचारात घेऊन कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदे सद्यःस्थितीत रिक्त ठेवणे योग्य नाही, असे नमूद करीत आयुक्त सिंह यांनी उपअभियंत्यांच्या कार्यकारी अभियंता पदावर तात्पुरत्या पदोन्नतीस मंजुरी दिली आहे.
महापालिका सेवेतील उपअभियंता संवर्गातील पदेही पदोन्नतीने भरण्यास पदोन्नती समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार १६ कनिष्ठ अभियंत्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार उपअभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात केवळ एक महिलेचा समावेश आहे.















