- एसटी महामंडळाकडून रामलल्लाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या थेट बस….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गदीं करत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन एसटी महामंडळाने रामलल्लाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुणे आगारातून या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती पुणे आगारातून देण्यात आली.
अयोध्येतील राम मंदिराविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेल्या आस्थेतून दर्शनासाठी रेल्वे गाड्या हाऊसफुल धावत आहेत. तसेच राजकीय नेतेही तेथे जाण्यासाठी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून दररोज दहा रेल्वे गाड्यांची भाविकांसाठी सोय केली आहे. या रेल्वे गाड्यांपाठोपाठ एसटीबसेसदेखील अयोध्या दर्शन घडविणार आहे. राज्यातील पहिली एसटी बस धुळे जिल्ह्यातून सोडण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता पुणे शहरातूनदेखील ४५ जणांच्या ग्रुपनुसार बस सोडण्यात येणार आहे.
अयोध्याला जाणाऱ्या भाविकांना प्रतिकिलोमीटर ५६ रुपये असे भाडे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी ४५ भाविकांचा ग्रुप असणे आवश्यक आहे. या प्रवासासाठी दोन चालक देण्यात येणार आहेत. यासाठी उत्तम दर्जाच्या गाड्या असणार आहेत. प्रवासासाठी तीन ते चार दिवसांचा मुक्काम होईल. त्यामध्ये आरामदायी प्रवासासाठी शिवशाही बस, स्वस्त प्रवासासाठी लालपरी देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाला राज्यात व परराज्यात प्रवासी वाहतुकीचा करार असणाऱ्या राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करताना परमिट काढण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यातील वाहतूक परमिट काढावा लागणार आहे. त्यामध्ये भाड्याच्या स्वरुपात प्रवाशांकडून पैसे घेतले जाणार आहेत.