न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- शहरात विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविणाऱ्या चालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मोठी कारवाई केली. वर्षभरात १० हजार २२६ चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटची सक्ती नसल्याने विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांची संख्या अधिक आहे. दुचाकीचे एक्सिलेटर पिरगाळत सुसाट वाहन दामटविणाऱ्या तरुणांच्या अपघाताची संख्या वाढत आहे. यामुळे तरुणांना प्राणास मुकावे लागले आहे. अपघातात बळी जाणाऱ्या तरुणांच्या मृत्युचे कारणही जाणून घेण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तपासाअंती मृत्यू पावणाऱ्यांमध्ये विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या चालकांचे अधिक मृत्यु झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे. त्याकारणाने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे.
बीआयएस मार्कचेच हेल्मेट बंधनकारक
स्वस्त दरात असलेल्या लोकल हेल्मेटचा वापर केल्याने अपघातात चालकांना दुखापत होते अथवा मृत्युलादेखील सामोर जाव लागते. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार देशात दुचाकींसाठी केवळ बीआयएस मान्यताप्राप्त हेल्मेटच्या निर्मिती आणि विक्रीला परवानगी आहे. हेल्मेटची खरेदी करताना नागरिकांनी बीआयएस मान्यताप्राप्त आणि आयएसआय मार्क असलेले हेल्मेटचे परिधान करणे आवश्यक आहे.