- तुकाराम महाराज बीजेनिमित्त सुदुंबरेत हरिनामाचा गजर; अखंड कीर्तनसेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे वार्ताहर (दि. २६ मार्च २०२४) :- ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ संतांना दोन्ही बाजु अवगत असतात. त्यांच्यात हिताचे ज्ञान आणि तळमळ आहे. पोकळ गप्पा मारणारे पुष्कळ आहेत. अनेकांना कल्याण आणि हीत यामधील फरक कळत नाही. भोगी मनुष्य श्रेय निवडतो. परमार्थ करताना परमेश्वर करेवर नेतात म्हणजेच पलीकडील तीरावर नेतात. परमार्थात कष्ट आहेत. परमार्थात वैराग्य पाहीजे. तरच विषयांवर आणि इंद्रियांवर ताबा प्राप्त करता येतात. संत आपल्याला सांभाळतात आपल्यावर कृपादृष्टी करतात. त्यामुळेच आपल्याला सर्वसुख आणि परमात्मा प्राप्त होतो. भाविकांनी भजन आणि कीर्तन आवडीने केले पाहिजे, असं प्रबोधन कीर्तनकार हभप. ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज यांनी उपस्थितांसमोर केलं.
संत तुकाराम महाराज बीजनिमित्त सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे मंदिरात अखंड कीर्तन सेवा सुरु आहे. त्यास आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेची साथसंगत आहे. बुधवारी (दि. २७) रोजी कीर्तनसेवेचा समारोप होणार आहे. सुदुंबरे येथून सकाळी देहू येथील वैकुंठगमन परिसराकडे संत संताजी महाराज यांच्या रथासह दिंडी निघणार आहे, अशी माहिती श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली आहे.
१९४२ पासून बीज सोहळ्यानिमित्त अखंड कीर्तन सेवेचे व्रत सुरु आहे. अनेक नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन इथे झाली आहेत. हि परंपरा पुढेही अशीच सुरु ठेवणार असल्याची माहिती हभप सुखदेव महाराज आणि राजपूत महाराज यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत संताजी महाराज जगनाडे ट्रस्टचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांनी परिश्रम घेतले आहेत.


















