- पिंपरी-चिंचवड आरटीओत पाच ‘इंटरसेप्टर’ वाहने दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- महामार्गावरील वाहनांचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड आरटीओत पाच इंटर सेप्टर वाहने दाखल झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, पुणे आणि बारामती प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना ही वाहने देण्यात आली आहे.
राज्य सरकारने परिवहन विभागाला १८७ इंटर सेप्टर वाहने खरेदीला परवानगी दिली होती. त्यानुसार ही वाहने खरेदी करून मुख्यमंत्र्याच्या हस्ते सर्व वाहने परिवहन विभागाला सुपूर्द करण्यात आली. त्यानुसार परिवहन विभागाकडून या वाहनांचे वाटप राज्यातील ५१ आरटीओला करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक इंटर सेप्टर वाहने ही पुणे जिल्ह्याला देण्यात आली आहे.
पुणे आरटीओला सर्वाधिक ७, पिंपरी चिंचवड आरटीओला ५ आणि बारामती आरटीओला २ वाहने देण्यात आली आहेत. आरटीओच्या भरारी पथकांना इंटर सेप्टर वाहनांच्या मदतीने वेगाने वाहने चालविणाऱ्यांबरोबरच सर्व प्रकारची कारवाई करणे शक्य होणार आहे.
पुणे जिल्ह्यात महामार्ग, एक्सप्रेस वे, राज्य मार्ग यांची संख्या जास्त असल्यामुळे राज्यात सर्वाधिक वाहने पुण्याला देण्यात आली आहेत. आरटीओसाठी इंटर सेप्टर वाहने महिंद्रा अॅण्ड महिंद्र कंपनीने तयार केली आहेत. त्यामध्ये लेझर बेस स्पीड गन, लेझर कॅमेरा, अल्कोहोल ब्रेथ ऍनालायझर विथ प्रिन्टर अशी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी देखील या इंटर सेप्टर वाहनांच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे.













