न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे आपल्या मतदार संघातील निगडी परिसरात निवडून आल्यानंतर एकदाही फिरकले नाहीत. मतदार संघातील या भागात काहीच विकास कामे केलेली नाहीत. खासदार अमोल कोल्हे फक्त निवडणुकीत मत मागण्यांसाठी येत असून, विकास करण्यासाठी येत नाही. त्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघ येथील सेक्टर 22 चा विसर पडला आहे. त्यामुळे या लोकसभेसाठी खासदार अमोल कोल्हे यांना निगडी परिसरात प्रचार करण्यासाठी विरोध करण्यात येणार आहे., असा निर्वाणीचा इशारा पिंपरी-चिंचवड भाजप चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे.
काळभोर यांनी अमोल कोल्हे यांना विरोध दर्शवित त्यांच्यावर घणाघाती आरोपदेखील केलेले आहेत. निगडी येथील सेक्टर 22 जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल प्रकल्प पूर्ण होऊन १२/१३ वर्ष झाली तरीही पात्र ९२० लाभार्थ्यांना घरकुल प्रकल्पामध्ये घर मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत असून, त्या संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी एकदाही कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही. किंवा त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून, तसेच निगडी येथील पीसीएमसी कॉलनी येथील जुन्या इमारती धोकादायक झाल्या असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे पीसीएमसी कॉलनी येथील इमारत पुनर्विकास होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला नाही.
पीसीएमसी कॉलनी या ठिकाणी ९ इमारती असून, ६४ घरे एका इमारतीत असून, इमारत बांधकाम पूर्ण होऊन ५० वर्ष उलटली असून इमारत बांधकाम धोकादायक झाले आहे. त्यामुळे ही इमारत केव्हाही कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. येथील नागरिकांना पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे म्हणून खासदार अमोल कोल्हे यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे निगडी येथील भागात खासदार अमोल कोल्हे यांना निवडणूक प्रचारात येवू दिले जाणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे.


















