न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २६ मार्च २०२४) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने तीन ठिकाणी वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्गावरून देहुकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी व सार्वजनिक वाहतूक बसेससाठी माळीनगर लगत असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील लष्कराच्या विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच, विठ्ठलनगर येथे जय मल्हार हॉटेलजवळ तर गायराणामधील क्रीडा संकुल अशा तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी या वाहनतळांचे सपाटीकरण करण्यात आले. संबंधित वाहतूक शाखेचे अधिकारी या कामावर लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना करत होते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहूनगरीत दाखल होणाऱ्या भाविक, भक्तांना कसलाही त्रास होणार नाही, त्यांना हा वैकुंठगमन सोहळ्या चांगल्या प्रकारे अनुभवता यावा यासाठी जिल्हा, तालुकास्तरावरील प्रशासन तसेच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे अधिकारी पदाधिकारी सज्ज झाले आहेत.