- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश..
- तब्बल वीस वर्षानंतर घरवापसी; लोकसभेचे तिकीट पक्के…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. २६ मार्च २०२४) :- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (दि. २६) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला.
शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटीलदेखील उपस्थित होते. शिवाजीरावांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी खासादर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आढळराव यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. परंतु, अजित पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील आणि आढळराव यांच्यात दिलजमाई झाली. त्यामुळे आढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार शिवाजीरावांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळराव यांच्या प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच राहणार आहे.