- ठीक बाराच्या ठोक्याला ‘हरीनामा’चा गजर अनं डोलू लागले नांदुरकीचं झाडं…
- अचानक प्रकट झालेल्या त्या कावळ्यांमुळे भक्तांमध्ये कुतुहूल..
- पहा सोहळ्यातील क्षणचित्र….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २७ मार्च २०२४) :- संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन ‘तुकाराम बीज सोहळा’ आज बुधवारी (दि. २७) रोजी देहू नगरीत पार पडला. ठीक दुपारी बारा गजर झाला आणि नांदुरकीचे झाडं हलले.


भक्तांनी फुले उधळून हरिनामाचा गजर केला. दरम्यान वैकुंठ गमन मंदिरासह नांदुरकी वृक्षाच्या वर चार कावळे अचानक प्रकट झाले आणि त्यांनी अडीच प्रदक्षिणा पूर्ण केली. यामुळे भक्तांमध्ये कुतुहूल निर्माण झाले होते.

दरम्यान मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देशी-विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मधील मंदिरात करण्यात आली होती. देहूत इंद्रायणी नदी काठ भाविक भक्तांनी फुलून गेला.

वैंकुठगमन मंदिरातील संत तुकाराम महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर नांदूरकीच्या झाडाचे दर्शन घेतल्यावर हा बीज सोहळा पूर्ण झाला. त्यासाठी लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते. तर इंद्रायणी तिरी स्नान करून वारकरी पुढे तुकोबांच्या दर्शनासाठी रवाना झाले होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आणि वाहतूक विभागानं चोख बंदोबस्त ठेवला होता. कुठेही अनुचित घटना घडली नाही. यात्रा काळात सर्व प्रकारांच्या वाहनांना देहूनगरीत प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.

जुना पुणे-मुंबई महामार्गावरील मल्हारी तरस प्रवेश द्वाराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील डॉग स्कॉडनं संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली होती.






















