- दर्शनी भागात झोपडीधारकांना मिळणार सोयी-सुविधायुक्त सदनिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी विकसकाकडून नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात ११०० झोपडयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वात जुन्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला आता सुरुवात झाली आहे.
रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर यांनी सांगितले की, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर ही शहरातील पहिली अधिकृत घोषित झोपडपट्टी आहे. मात्र गेल्या १७-१८ वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापासून याठिकाणचे नागरिक वंचित होते. या कारणामुळे ही सर्वात जुनी झोपडपट्टी असतानादेखील शहरातील अन्य भागांमधील अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनदेखील झाले आहे. या झोपडपट्टीमध्ये साधारणतः साडे चार हजार झोपड्या आहेत. अनेक झोपड्या रेल्वेच्या जागेत आहेत. तर या जागेचे क्षेत्रफळ पाहता सर्वच झोपडपट्टीधारकांना सदनिका या ठिकाणी उपलब्य होणार आहेत. त्याकरिता पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण पार पडले आहे. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शैलेश मोरे, प्रसाद शेट्टी आदी आजी माजी लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
दरम्यान, या भागातील काही नागरिकांनी या नियोजित प्रकल्पाला विरोधदेखील दर्शविला होता. मात्र या प्रकल्पाचे फायदे समजू लागले असून, याठिकाणी स्वत:च्या मालकीचे पक्के घर होणार असल्याने, नागरिकांचा विरोध आता मावळला आहे. त्यामुळे आता हे पुनर्वसन होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
शहरातील सर्वांत जुन्या झोपडपट्टीचे पुनर्वसन झाल्याने नागरिकांचे जीवनमान सुधारणार आहे. तसेच शहराच्या महत्वाच्या भागात दर्शनी भागातील झोपडपट्टीच्या पुनर्वसनाने शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. – अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी विधानसभा…