न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२४) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत अटकवून ठेवलेल्या अकरा वाहनांचा पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे ई-लिलाव करण्यात आला. त्यामध्ये, ३८ लाख ९० हजार रुपयांचा महसूल जमा झाला.
या ई-लिलावासाठी कर न भरलेली व गुन्ह्यांत अटकवून ठेवलेली १३ वाहने उपलब्ध होती. यात बस, एचजीव्ही, एलजीव्ही, डी-व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, एक्सकॅव्हेटर आदी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या मालकांना वेळोवेळी संधी देऊनही थकीत कर भरणा केला नसल्याने या वाहनांचा www.eauction.gov.in या शासकीय संकेतस्थळावर ई- लिलाव ठेवण्यात आला. त्यापैकी ११ वाहनांना ऑनलाइन बोली प्राप्त झाली.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत जाहीर ई-लिलावाद्वारे १ कोटी ४८ लाख रुपयांचा शासकीय महसूल वसूल करण्याची कार्यवाही केली आहे. थकीत मोटार वाहन कर वसुलीकरिता यापुढेही ई-लिलाव केले जातील, याची नोंद घेऊन थकीत मोटार वाहन कर भरावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.