न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२४) :- पुण्यातील राजकीय बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘जागृत पुणेकर’, या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनर्समध्ये पाच वर्ष पक्ष सोडणार नाही असं आश्वासन देणाऱ्या उमेदवारालाच आपलं मत द्या, अस आवाहन करण्यात आलं आहे. जुन्या पुणे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे बॅनर्स कोणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जागृत पुणेकरांनो, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना आपल्या परिचय पत्रात एकच उल्लेख करावा, की ”मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका,” जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिन त्यांनाच मतदान करा, असा मजकूर या बनर्सवर लिहिण्यात आला आहे.
दरम्यान सजग नागरिक मंचाचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी प्रतिक्रिया दिली. या बॅनर्स कोणी लावले, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, या बॅनर्समधील मजकुरांशी आम्ही सहमत आहोत. यावरून जनतेच्या मनात नेत्यांविरोधात नाराजी आहे, हे दिसून येते. लोकांना पक्ष आणि पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहणारा उमेदवार हवा आहे, हे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले.