- चिंचवड आणि पनवेल मतदारसंघांत पाच लाखांपेक्षा अधिक मतदारसंख्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२४) :- राज्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे अठरा हजार मनुष्यबळाची गरज असून, त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. मनुष्यबळाची मागणी, त्याची यादी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
लोकसभेच्या मावळ मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा संघ येतात. हे सर्व मिळून सुमारे २५ लाख मतदान आहे. त्यापैकी सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड आणि पनवेल या मतदारसंघांत पाच लाखांपेक्षा अधिक मतदारसंख्या आहे.
दरम्यान, मावळची मतदारसंख्या तुलनेने सर्वाधिक असल्याने येथे मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होणार आहे. सद्यःस्थितीत सुमारे १८ हजार अधिकारी व कर्मचारी यांची गरज आहे. त्यानुसार शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाबाबत पत्रव्यवहार केला आहे.
पीएमआरडीएच्या ४६ जणांना निवडणुकीचे कामकाज दिले असून, केवळ पिंपरी व चिंचवड नव्हे तर उरण व पनवेल या ठिकाणीही कामकाजाचे वाटप होणार आहे. त्याचप्रमाणे इतर विभागातील ग्रामपंचायत आणि महसूल विभागासही कामकाजाचे वाटप केले जाणार आहे. मावळ व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. दुसरीकडे, ऐन उन्हाळ्यामध्ये प्रचार करताना उमेदवारांची घालमेल होणार आहे.
निवडणूक कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन वायुवेग पथकांना तसेच सीमा तपासणी नाक्यावरील कार्यरत मोटार वाहन निरीक्षक यांना अधिक वाहनांची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक काळात वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, अमली पदार्थ व मद्य वाहतूक अथवा निवडणुकीच्या धर्तीवर प्रलोभन दाखविणाऱ्या भेटवस्तू घेऊन जात असतात. असे आढळल्यास वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याची माहिती त्या वाहतूक निरीक्षकाने देणे आवश्यक आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध झाले आहे. अद्याप त्याची यादी तयारी सुरू आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
– दीपक सिंगला, अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए तथा निवडणूक निर्णय अधिकारी (मावळ)


















