घड्याळाचीच यंदाही टिकटिक वाजणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये तेव्हाचा खेड लोकसभा मतदारसंघ भाजपकडे होता. शिवसेनेने १९९१ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपकडून आपल्याकडे घेतला. तेव्हापासून तब्बल ३३ वर्षे खेड आणि त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा धनुष्यबाण असायचा. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत शिरूरमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नसेल, हे स्पष्ट झाले आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी २००४ मध्ये शिवसेनेचा सहारा घेतला व त्यातून शिवसेनेला सलग ३ वेळा शिरूरमधून यश मिळवून दिले. शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव हे शिंदे गटात गेले. परंतु काही काळाने अजित पवार गटही महायुतीत आला. जागा वाटपात शिवसेनेचीही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने शेवटी तडजोडीत उमेदवार शिवसेनेचा, परंतु तो लढणार अजित पवार गटाकडून, असे ठरविण्यात आले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जुन्या खेडमधून शिरूर लोकसभा मतदारसंघ तयार झाल्यानंतर झालेल्या चार निवडणुकांपैकी ३ निवडणुका शिवसेनेचे आढळराव पाटील यांनी जिंकल्या होत्या. १९५७ पासून झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळविला होता. १९५७ साली शेड्यूल्ड कास्टचे बाळासाहेब साळुंके, १९८९ मध्ये जनता दलाचे किसनराव बाणखेले आणि २०११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे विजयी झाले होते. समाजवादी पार्टी, जनता पार्टी, जनता दल हेच सुरुवातीला काँग्रेसचे विरोधक होते. १९८९ मध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून संभाजी भुजबळ हे उमेदवार होते.
सन १९९६ मध्ये मतपत्रिकांवर मतदान होत असे. त्यावेळी अधिक उमेदवार असतील तर मतपत्रिकेत समोरासमोर उमेदवारांची नावे असत. मतपत्रिकेच्या सुरुवातीला राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष आणि त्यानंतर अपक्ष, अशी उमेदवारांची यादी असे. पहिल्या रकान्यात प्रथम उमेदवाराचे चिन्ह आणि नंतर त्याचे नाव असायचे.













