न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२४) :- गेली वीस वर्षे बंद असलेला मावळ तालुक्यातील इंदोरीचा मंगळवारचा आठवडे बाजार व जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्यास सहायक निबंधक यांनी मान्यता दिल्याने हा बाजार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासंदर्भात मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे यांच्यासह माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक विठ्ठल ढोरे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच स्वप्निल शेवकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोरे यांनी सहायक निबंधक यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता, या पाठपुराव्याला यश आले आहे.
दिलीप ढोरे म्हणाले, की इंदोरी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मागणी पूर्ण झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करत आहेत. कारण परिसरात वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चाकण व इंदोरी येथेच जनावरांचा बाजार सुरु होता. मात्र, इंदोरी बाजार अनेक वर्षांपासून बंद होता. आठवडे बाजारामुळे शेतकरी व ग्राहकांची सोय होते. शिवाय अन्य नव्याने व्यवसाय सुरु होण्यास प्रेरणा मिळणार आहे. तसेच तालुक्यातील उलाढालीतही वाढ होणार आहे.















