न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२४) :- पीएमआरडीएच्या वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाचे काम संथगतीने पूर्ण झाले. त्यानंतर आता या गृहप्रकल्पातील घरांचा ताबाही नागरिकांना उशिराने मिळत आहे. आतापर्यंत केवळ ६२ कुटुंबीयांनाच या प्रकल्पातील घरांचा ताबा मिळाला आहे. नागरिक ताबा घेण्यासाठी पुढे येत नसल्याने अडचणी जाणवतअसल्याचे पीएमआरडीए प्रशासनाचे म्हणणे आहे.
वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० व ३२ मध्ये तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (सध्या ७९२ घरांच्या प्रकल्पाला २०१६ मध्ये मंजुरी मिळाली) सप्टेंबर २०१९ पर्यंत हा प्रकल्प होणे अपेक्षित होते. मात्र दिलेल्या मुदतीतही हे काम पूर्ण झाले नाही. ठेकेदाराला त्यासाठी ४ वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्रकल्प पूर्ण झाला. ही घरे वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. सोडतीमध्ये १९२ लाभार्थी विजेते ठरले होते. त्यापैकी ११९ लाभार्थी कुटुंबीयांनीच घरे घेण्याची तयारी दर्शविली. त्यातील ६२ जणांनीच घरांचा ताबा घेतला. तर, ५७ जणांची नोंदणी व ताबा घेण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू असल्याने वाल्हेकरवाडीतील उर्वरित घरांची तसेच पेठ क्रमांक १२ येथील १ हजार २६० घरांची सोडत काढता येणार नाही. आचार संहिता संपल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे.
—














