- सातबारा आणि प्रत्यक्ष जमीनीमधील तफावत लगेच समजणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२४) :- राज्यात भूमी अभिलेख विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबारा उताऱ्यावरून शेतकऱ्यांची जमीन किती आहे, हे समजते. ही मोजणी रोव्हर्सद्वारे करण्यात येते. राज्यातील पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेत अन्य ३२ जिल्ह्यांमधील प्रत्येकी तीन गावामंध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अनेकदा सातबाऱ्यांवर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत आढळते. अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा चांगला पर्याय असून, त्यासाठी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.
या अर्जाचा नमुना bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, तीन महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रे लागतात.
डिजिटल नकाशे मिळणार…
या डिजिटल नकाशाची अचुकता १५ सेंटी मीटरची आहे. पूर्वी देण्यात येणाऱ्या नकाशाची वैधता केवळ सहा महिने ते एका वर्षाची असायची. मात्र, या ऑनलाइन नकाशीची वैधता आता मात्र अक्षांश, रेखांश मिळाल्यानंतर कायमस्वरूपी राहणार आहे. नकाशावरील अक्षांश, रेखांश सर्वांना दिसेल. त्याची पडताळणी करायची असल्यास जीपीएसद्वारे, मोबाइलद्वारे तुमच्या जमिनीच्या मिळकतीच्या सीमा पाहू शकाल. जीपीएसवर अक्षांश, रेखांश टाकल्यानंतर अचूक ठिकाणी पोहोचता येईल.
शेतक-यांच्या सातबा-यांवर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये अनेकदा तफावत असते. रोव्हरद्वारे होणारी मोजणी करताना मानवी हस्तक्षेप राहात नाही. त्यामुळे अचूक मोजणी होते. भविष्यात पुन्हा मोजणी करायची असल्यास अक्षांश व रेखांशाच्या आधारे कमी वेळेत मोजणी पूर्ण होते. शेतकऱ्याने मागणी केल्यास त्यात आढळून आलेल्या अडचणी तातडीने सोडवता येतात. यामुळे काम गतीने होते. तसेच मोजणीमध्ये कोणत्याही अडचणी राहत नाही.
– कमलाकर हात्तेकर, भूमी अभिलेख विभाग, पुणे…