न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२४) :- पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम साडेबारा वर्षांपासून ठप्प आहे. त्यासाठीचे पाइप मावळ तालुक्यातील खासगी जागेत ठेवले आहेत. साहित्याचे रावेत येथे स्थलांतर करण्यास ठेकेदाराने विलंब केल्याने महापालिकेस सुरक्षारक्षक व जागा भाडे असा आठ कोटींचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
खासगी जागेत असलेले पाइप व यंत्रसामग्री रावेत येथील गायरान जागेत स्थलांतरित करण्याचे काम १५ फेब्रुवारी २०२४ ला बालाजी इंजिनिअर्सला देण्यात आले. या कामाची मुदत ३ महिने होती. मात्र, या कालावधीत हे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या सहा महिने कालावधीसाठी जागा भाडे ५९ लाख ९५ हजार २५ रुपये आणि सुरक्षारक्षकांचे वेतन २ लाख १० हजार असे एकूण ६२ लाख ५ हजार २५ रुपये ठेकेदारास अदा करण्यात येणार आहेत. खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.
पाइप आणि यंत्रसामग्री ठेवण्यासाठी ठेकेदाराने मावळ तालुक्यातील जागा भाड्याने घेतली. जागा भाडे व सुरक्षारक्षकांचा खर्च देण्याबाबत ठेकेदारांनी पालिकेकडे मागणी केली होती. त्यासंदर्भात १७ ऑगस्ट २०२३ ला अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. जागेचे भाडे आणि सुरक्षारक्षकांचे बिल १ मे २०१९ पासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ठेकेदारास देण्याचा निर्णय बैठकीत झाला.
एकूण साडेचार वर्षांचे जागा भाडे ६ कोटी ३५ लाख ८८ हजार ५९७ रुपये आणि सुरक्षारक्षकाचे बिल एकूण १ कोटी ३२ लाख ३६ हजार इतके आहे. असे एकूण ७ कोटी ६८ लाख २४ हजार ५९७ रुपये आहे. बिलात जीएसटी अतिरिक्त आहे, असे एकूण आठ कोटींपेक्षा अधिकचे बिल आहे.













