न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- पावसाळापूर्व कामातील नियोजनाचा भाग असलेल्या नालेसफाईच्या कामाला कधी वेग येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणा-या नाल्यांची सफाई कामास अद्याप वेग आलेला नाही. दुसरीकडे काम सुरु झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात तसे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे दीड महिन्यात शहरातील लहान मोठ्या अशा १४८ नाल्यांची सफाई ३१ मे पर्यंत कशी पूर्ण करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये २ ते ११ मीटर रुंदीचे शंभर किलो मीटर अंतराचे १४८ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. मात्र, या नाल्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अजिबात नियंत्रण नाही. कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. त्यामुळे सर्वच नाल्यांमध्ये नागरिकांकडून राडारोडा, प्लॅस्टिक, भंगार आणि टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती कचरा नाल्यांमध्ये टाकतात. नाल्यात गाळ साचल्याने नाले अरुंद आणि उथळ झाले आहेत. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची नाल्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून लोकवस्तीतील नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरते.
पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्व नाले स्वच्छ केले जातात. यंदाही पावसाळापूर्व नालेसफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी २२ मार्च रोजी आरोग्य विभागाचे उपायुक्त यशवंत डांगे यांना दिले आहेत. परंतु, आरोग्य विभाग आयुक्तांच्या आदेशाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होत असते. पाऊस सुरू झाल्यास नालेसफाईचे काम करता येत नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच हे काम पूर्ण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य, स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. परंतु, अद्यापही नालेसफाईला सुरुवात केलेली नाही. त्यातच ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु, कामाला सुरुवातच केली नाही, तर ते पूर्ण होणार तरी कसे. या कामासाठी अवघा दीड महिन्यांचा अवधी राहिलेला आहे. दीड महिन्यात लहान मोठे असे तब्बल १४८ नाल्यांची सफसफाई करावी लागणार आहे.
नाले सफाईचे काम सुरु करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार सध्या नाले सफाई सुरु करण्यात आलेली आहे. आम्ही आदेश देतो, प्रत्यक्षात काम क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केले जाते. सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सफाईची कामे सुरु झाली आहेत.
– यशवंत डांगे, उपायुक्त, आरोग्य विभाग…