न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- ‘‘संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत तरल्या. या गाथेतील अभंग हे समाजाला तारुण नेत आहेत. संतांचे विचार घरोघरी पोचले पाहिजे,’’ असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी गुरुवारी (दि. ११) देहू येथे केले.
संत तुकोबांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडविण्यात आली. इंद्रायणीच्या डोहा काठी संत तुकाराम महाराजांनी तेरा दिवस अनुष्ठान केले. चौदाव्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेला गाथा आहे, तशा तारुण वर आल्या. या दिवसाचे औचित्य साधत गाथा परिवाराच्या वतीने देहूतील इंद्रायणीच्या डोहा काठी गाथा पुनरुत्थान दिवस साजरा केला. त्यावेळी पुरुषोत्तम महाराज मोरे बोलत होते.
गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील, आळंदी येथील तुकाराम महाराज घाडगे, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, नगराध्यक्षा पूजा दिवटे, मधुकर कंद, प्रभाकर भोसले, ममता झांजुर्णे, गीतांजली देवाळकर, रवींद्र कंद उपस्थित होते.
परिवाराच्या वतीने इंद्रायणीच्या डोहात उभे राहून एकशे पंचवीस अभंगाचे वाचन तुकाराम महाराज घाडगे यांनी केले. सामुदायिक गाथा वाचनामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. गाथा वाचनानंतर प्रसिद्ध चित्रकार भास्कर हांडे यांचे व्याख्यान झाले.
गाथा पुनरुत्थान दिनानिमित्त संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथेचे पूजन देऊळवाड्यात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पैठण येथील कीर्तनकार भास्कर महाराज बारे यांचे ‘तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम’ या अभंगावर कीर्तन झाले. संस्थानच्या वतीने कीर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे.