न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असल्यास १४ एप्रिलपर्यंत रात्री बारापर्यंत मतदार नाव नोंदणी करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्ज पात्र ठरल्यास त्या मतदाराचे नाव पुरवणी यादीत येईल. त्यामुळे त्या नवमतदारास १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
निवडणुकीस मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून नागरिकांना शेवटच्या क्षणापर्यंत संधी दिली जाते. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी व्हावी म्हणून निवडणूक विभागाने विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेत २३ जानेवारी २०२४ पर्यंत नवीन मतदार, स्थलांतरीत अशा मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली. मावळ लोकसभा मतदार संघात त्या तारखेपर्यंत २५ लाख ९ हजार ४६१ मतदार संख्या झाली. तसेच, शिरूर लोकसभा मतदार संघात २४ लाख ७९ हजार ७४३ मतदार होते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या नावनोंदणीत १० एप्रिल २०२४ पर्यंत ही संख्या वाढली आहे. त्या मुदतीमध्येही नाव नोंदणी न केलेल्यांना नागरिकांना अखेरची संधी देण्यात येणार आहे.
मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज १८ एप्रिलपासून स्वीकारण्यात येणार आहे. त्या दिवसांच्या ४ दिवस आधी मतदार नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात येते. त्यानुसार १४ एप्रिलच्या रात्री १२ पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना ही अखेरची संधी असणार आहे. वयाचा पुरावा आणि राहण्याचा पत्तासंदर्भातील पुरावा अशी आवश्यककागदपत्रे व स्वतःचे छायाचित्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज पात्र ठरल्यास त्यांचे नाव पुरवणी मतदार यादीत समाविष्ट केले जाईल, असे चिंचवड विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.