न्यूज पीसीएमसी नेटवर्क
करंदी (दि. १६ एप्रिल २०२४) :- शिवाजीराव आढळराव पाटलांनी दत्तक घेतलेल्या करंदी गावच्या दौऱ्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने भर सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या कार्यकर्त्यांच्या सर्व प्रश्नांची सप्रमाण उत्तर देत हेच प्रश्न ज्यांना तुम्ही पंतप्रधान करायचं म्हणून निवडणूक लढवत आहात त्या शिवाजीराव आढळराव पाटलांना विचाराल का? असा प्रतिसवाल केला.
महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दत्तक घेतलेल्या करंदीगावाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची सभा सुरु होण्यापूर्वी शिंदेगटाच्या कार्यकर्त्याने करंदी गावासाठी काय केलं, असा प्रश्न विचारत कोंडीत पकडण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, शांतपणे ऐकण्याची ताकद ठेवा. प्रश्न विचारल्याबद्दल मनापासून आभार मानतो, असं म्हणत जसा प्रश्न मला विचारता, तसा प्रश्न ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मत मागायला जाणार आहात ना त्यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही, याची आठवण करुन देत, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या कामांचा पुरावा दिला. तर हेच प्रश्न ज्यांना तुम्ही पंतप्रधान करायचं म्हणून निवडणूक लढवत आहात त्या शिवाजीराव आढळराव पाटलांना विचाराल का असा प्रतिसवाल केला.
कांदा निर्यातीच्या प्रश्नांवर संसदेतून निलंबित होणं स्वीकारलं, पण तिकीटासाठी बेडूक उड्या मारल्या नाहीत, हे सांगत असतानाच डॉ कोल्हे यांनी कांदा उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी यांची करण्यात येत असलेली कोंडी यावर प्रश्नकर्त्याला निरुत्तर करत. आपण शिरुर तालुक्यातील केलेल्या कामांची यादीच दिली.